अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला, राज्य सरकारची घोषणा

Foto
मुंबई : शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांची रायगडचं पालकमंत्रिपद मिळवण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे .  गोगावलेंची रायगडच्या पालमंत्रिपदी नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली  आहे. तसेच नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढाही सुटला असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

२०२४ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर रायगड  आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला होता. रायगडमध्ये शिंदेसेनेकडून भरत गोगावले, तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून अदिती तटकरे ह्या पालकमंत्रिपदासाठी इच्छूक होत्या.  तर नाशिकच्या पालकमंत्रिपदावर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून दावा करण्यात येत होता.

अखेरीस या दोन्ही प्रमुख जिल्ह्यातील पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यात महायुती सरकारला यश आले आहे. त्यात रायगडचं पालकमंत्रिपद शिंदेसेनेच्या तर नाशिकचं पालकमंत्रिपद भाजपाच्या खात्यात गेलं आहे. तसेच रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावले यांची तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.